Home महाराष्ट्र साहित्य समाजाचा आरसा…..

साहित्य समाजाचा आरसा…..

43
0

पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्‍या १२४ जयंतीनिमित्त साहित्‍य आणि कलागौरव पुरस्‍काराचे प्रवरानगर येथे वितरण

गणराज्य लोणी/प्रवरानगर – साहित्य समाजाचा आरसा असतो. साहित्यिक समाजाचे प्रतिनिधी म्हणून सामाजिक विषयांना वाचा फोडत असतात. साहित्यिक आपल्या लेखणीतून समाज जागृतीचे काम करित असतात. सामान्य माणसे, वंचितांना साहित्यिकांच्या लेखणीचा आधार वाटला पाहिजे. अशी अपेक्षा केंद्रीय आयुष तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्य मंत्री प्रतापराव जाधव यांनी आज येथे व्यक्त केली.

 

पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्‍या १२४ जयंतीनिमित्त यावर्षीच्या साहित्‍य आणि कलागौरव पुरस्‍काराचे वितरण आज प्रवरानगर येथे करण्‍यात‌ आले. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून श्री.जाधव बोलत होते. डॉ.धनंजयराव गाडगीळ सभागृहात झालेल्या साहित्‍य पुरस्‍कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ९७ व्‍या अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाचे अध्‍यक्ष रवींद्र शोभणे होते. याप्रसंगी राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील, माजी मंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ.राजेंद्र विखे पाटील, पुरस्‍कार निवड समितीचे अध्‍यक्ष डॉ.रावसाहेब कसबे, सदस्य डॉ.दिलीप धोंडगे, राजेंद्र सलालकर व पुरस्कार्थी लेखक, कलावंत आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

केंद्रीय राज्यमंत्री श्री.जाधव म्हणाले की, ‘एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ या संत तुकारामांच्या ओळीचा सार्थ प्रत्यय सहकार महर्षी पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांचे सहकार क्षेत्रातील कार्य पाहून येतो. डॉ.विठ्ठलराव हे उत्तम नाडी तज्ज्ञ होते. त्यांनी समाजाची नस चांगली जाणली होती. सहकाराची बीजे त्यांनी प्रवरानगर मध्ये रूजविली. सहकार क्षेत्रामुळे महाराष्ट्र राज्य देशात प्रगत राज्य म्हणून पुढे आले.

सहकार चळवळीमुळेच शेतकऱ्यांची सावकारी कर्जाच्या पाशातून मुक्तता झाली. डॉ.विठ्ठलराव हे सहकारमहर्षी तर होतेच ; पण शिक्षण व आरोग्य महर्षी सुध्दा होते. पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांनी डॉ.विठ्ठलरावांची परंपरा पुढे चालू ठेवली व टिकवली सुध्दा आहे. असे गौरवोद्गार ही श्री.जाधव यांनी यावेळी काढले.

पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांनी सहकार क्षेत्रात अविरतपणे ५० वर्ष काम केले. त्यांचे भारतरत्न पुरस्कार्थींच्या तोडीस तोड आहे. त्यामुळे केंद्र शासनाने त्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन गौरव करावा. अशी अपेक्षा कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.रविंद्र शोभणे यांनी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले की, फुले-शाहू-आंबेडकर यांचा समतेचा विचार प्रवरेच्या भूमीत रूजला आहे. गेली ३४ वर्ष सातत्याने पुरस्कार देऊन साहित्यिकांचा गौरव करणारा प्रवरा परिवार हा एकमेव आहे. यापुढे ही पुरस्काराची ही परंपरा कुठेही खंडीत होणार नाही. अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, जिल्ह्याला उज्ज्वल साहित्य परंपरा लाभली आहे. डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांचा स्मृतीदिन हा शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मागील ३४ वर्षापासून अखंडीतपणे साहित्यिक व कलावंताचा वेगवेगळे पुरस्कार देऊन गौरव केला जात आहे. यात कोठेही वाद होऊ न देता साहित्य पुरस्कारांचे वितरण करण्यात येत आहे. अहमदनगर जिल्ह्यात मराठी भाषा भवन बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच कामाला सुरूवात होणार आहे. राज्यातील पहिलेच मराठी भाषा भवन असणार आहे.

पुरस्कारार्थींच्या वतीने ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या पुरस्कार्थींचा झाला गौरव –
या पुरस्कार वितरण सोहळ्यातील पुरस्कार्थींची घोषण यावेळी पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ.रावसाहेब कसबे यांनी केली. त्यांनी या पुरस्कारार्थींच्या साहित्य व कला कार्याचा उपस्थितांना परिचय करून दिला. पुरस्कार्थींमध्ये मुंबई येथील जेष्‍ठ साहित्‍यिक आणि विचारवंत प्रेमानंद गज्वी यांना जीवनगौरव पुरस्‍कार (एक लाख रूपये रोख रक्कम व सन्मानचिन्ह), कानपूर येथील समीर चव्हाण यांच्‍या ‘अखई ते जाले या ग्रंथास उत्‍कृष्ट साहित्‍य पुरस्‍कार (एकावन्न हजार रूपये रोख रक्कम व सन्मानचिन्ह), नागपूर येथील प्रफुल्ल शिलेदार यांच्‍या ‘हरवलेल्या वस्तुंचे मिथक’ या कविता संग्राहास विशेष साहित्‍य पुरस्‍कार (पंचवीस हजार रूपये रोख रक्कम व सन्मानचिन्ह), संगमनेर येथील श्रीनिवास हेमाडे यांच्‍या ‘तत्वभान’ या वैचारिक ग्रंथास अहमदनगर जिल्‍हा उत्‍कृष्ट साहित्‍य पुरस्‍कार (दहा हजार रूपये रोख रक्कम व सन्मानचिन्ह), नेवासा येथील बाळासाहेब लबडे यांच्‍या ‘काळ मेकर लाईव्ह’ या कांदबरीस जिल्‍हा विशेष साहित्‍य पुरस्‍कार (दहा हजार रूपये रोख रक्कम व सन्मानचिन्ह), कर्जत येथील हसन शेख पाटेवाडीकर यांना कलेच्‍या सेबेबद्दल पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कलागौरव पुरस्‍कार (दहा हजार रूपये रोख रक्कम व सन्मानचिन्ह) व नाशिक येथील प्राजक्त देशमुख यांना नाट्यसेवा पुरस्‍कार आदी पुरस्काराने पुरस्कार्थींचा यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
या पुरस्कार वितरण सोहळ्यास माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील, जिल्‍हा परिषदेच्‍या माजी अध्‍यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांच्‍यासह विविध संस्‍थांचे पदाधिकारी तसेच साहित्‍यप्रेमी होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here