Home अहमदनगर वांबोरी चारीचा तिसरा पंप तीन दिवसात सुरू

वांबोरी चारीचा तिसरा पंप तीन दिवसात सुरू

23
0

राहुरी : 
राहुरी व पाथर्डी तालुक्यातील दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या वांबोरी चारीच्या योजनेतील तिसरा पंप येत्या दोन ते तीन दिवसात सुरू होईल त्यामुळे पाथर्डी तालुक्यातील अखेरच्या गावातील तळ्यात पाणी पोहोचणे शक्य होईल त्यासाठी अथक प्रयत्न करण्यात आले असून त्यास यश आले असल्याची माहिती माजी राज्यमंत्री व विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांनी वंचित गावांना न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे असे सांगितले. रविवारी दुपारी आमदार तनपुरे व लाभधारक शेतकऱ्यांनी मुळा धरण येथील वांबोरी चारी पंप हाऊसची समक्ष पाहणी करून वस्तुस्थिती जाणून घेतली व कोणती अडचण आहे त्यावर लगेचच उपाययोजना केली.त्यामुळे तिसऱ्या पंपाची दुरुस्ती व तांत्रिक अडचणी दूर झाल्या. येत्या दोन-तीन दिवसात तिसरा पंप लवकरच सुरू होऊन अखेरच्या तलावात पाणी जाण्याचा मार्ग मोकळा झाला .

वांबोरी चारीचे दोन पंप सध्या सुरू आहेत परंतु तिसरा पंप नसल्याने पाथर्डी तालुक्यातील तळ्यामध्ये पाणी जात नव्हते तेथील लाभधारक शेतकऱ्यांनी आमदार तनपुरे यांच्याकडे जाऊन तिसरा पंप सुरू करण्याची मागणी केली या मागणीनुसार आमदार तनपुरे यांनी शेतकऱ्यांना समवेत घेत वांबोरी चारीचे पंप हाऊस गाठले.व संबंधित अधिकारी तांत्रिक सहाय्यक व ठेकेदार यांची शेतकऱ्यांसमवेतच बैठक घेतली व अडचणी जाणून घेतल्या . वांबोरी चारी पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी अहमदनगर येथील पाटबंधारे कार्यालयात गेल्या एक महिन्यापूर्वी ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी अधिकाऱ्यांनी ठराविक वेळेची मुदत मागून घेतली होती. परंतु तिसरा पंप अद्यापही सुरू झाला नसल्याने पाथर्डी तालुक्यातील लाभधारक शेतकऱ्यांना पाणी मिळणार की नाही असा प्रश्न उभा राहिला . काही भागात अत्यल्प पाऊस झाल्याने तलाव कोरडेठाक पडलेले आहेत त्यामुळे चारीच्या पाण्याशिवाय अन्य पर्याय राहिला नाही . शेतकऱ्यांची तगमग पाहून आमदार तनपुरे यांनी पंप हाऊस येथे जाऊन उपाययोजना केल्या. विद्युत पंप दुरुस्तीचे काम करणाऱ्या ठेकेदाराची रक्कम थकलेली आहे आमदार तनपुरे यांच्या शब्दाखातर पंप दुरुस्त केले परंतु सध्याच्या सरकारकडून दुरुस्तीचे बिल मिळालेले नाही त्या बिलाची हमी आमदार तनपुरे यांनी घेतली असल्याने पंप दुरुस्त झाले. सध्या केवळ दोनच पंप सुरू असल्याने राहुरी तालुक्यातील गुंजाळे येथील तलावाच्या पुढे पाणी जात नाही व पुढील तलावात पाणी जाण्यासाठी कोणत्या उपाययोजना उपयोगी पडतील याची माहिती घेत लगेचच सूचना केल्या त्यामुळे पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी मिळण्याचा मार्ग सुलभ झाला. वांबोरी चारीतील पंपाचे काम युद्धपातळीवर व्हावे यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला आहे.
यावेळी सुनील पुंड कादर सय्यद विलास पुंड बुरान पठाण वसंत क्षीरसागर राजेंद्र घोडके शरद घोडके संजय लवांडे सुनील लवांडे गंगाराम शिंदे शिवाजी शिंदे माणिक शिंदे राजेंद्र पाठक यांचेसह वांबोरी तिसगाव भोसे सासवड करंजी मांडवे कडगाव या भागातील लाभ धारक शेतकरी उपस्थित होते.
चौकट _
मुळा धरणाचे ओव्हरफ्लोचे पाणी वांबोरी चारीला कधीही मिळालेले नव्हते आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रयत्नामुळे ओव्हरफ्लोचे पाणी मिळाले आहे तसेच चारीच्या हक्काचे पाणीही अबाधित राहणार आहे आम्हाला ओव्हर फ्लोचे पाणी तनपुरे यांच्यामुळेच मिळाले आहे दत्तात्रय रंगनाथ कोरडे कडगाव पाथर्डी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here