ब्राम्हणी – स्व.विलास बानकर इंग्लिश मीडियम स्कूलने भारतीय संस्कृती राबवत या संस्कृतीचे पाळेमुळे रुजवण्याचे काम केले. याशिवाय अध्यात्मिक वातावरण निर्माण करून विद्यार्थ्यांवर संस्कार घडविण्याचे काम केले आहे. अशीच प्रगती या विद्यालयाची पुढे होत जावो, असे प्रतिपादन हभप पुंडलिक महाराज जंगले शास्त्री यांनी केले.
राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथील स्व. विलास बानकर विद्यालयाच्या स्नेहसंमेलनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिक्षणाधिकारी मोहनीराज तुंबारे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून पो. नि. संजय ठेंगे तसेच संस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण बानकर, ब्राह्मणी सोसायटीचे अध्यक्ष शिवाजी राजदेव, केशवराव जवरे, आर.बी. चोळके, सरपंच सुवर्णाताई बानकर, केंद्र प्रमुख निलिमा गायकवाड, अरुण बानकर, आप्पासाहेब ढोकणे, किरण बानकर, प्रकाश बानकर आदी उपस्थित होते.
जंगले महाराज पुढे बोलताना म्हणाले की पंढरीनाथ बानकर यांनी या स्कूलचे मुहूर्तमेढ रोवून ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक दालन खुले करून दिले. भारतामध्ये साडेचार लाख हजार मुली गायब झालेल्या असून मुलींवर संस्कार होत नसल्यामुळे त्या परस्पर विवाह बंधनात अडकत आहेत. त्यासाठी मुलींवर सुसंस्कार होणे गरजेचे आहे. आपल्या आई-वडिलांची मान कशी उंचावेल, ही काळजी यापुढे मुलींनी करावी, असे आवाहन त्यांनी केले. राहुरीचे पो. नि. संजय ठेंगे म्हणाले, याठिकाणी असणाऱ्या विद्यार्थ्यांचे सुसंस्कार पाहून अभिमान वाटला. प्रत्येक शाळेमध्ये संस्काराबरोबर धार्मिक ग्रंथ, परंपरेचे धडे तीनही महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी भरतनाट्यम, रामायण, महाभारत, देशभक्ती कोळीगीत, छत्रपती शिवाजी महाराज, संत गोरा कुंभार, गणपती, देवीचा जागर, खंडोबा, गरबा अशा विषयांवर आधारित गीतांवर नृत्यविष्कार करून उपस्थितांची मने जिंकली. शाळेच्या प्राचार्यांनी पाहुण्यांचा सत्कार करून वार्षिक अहवाल वाचन केले. त्यानंतर शाळेतील विविध स्पर्धांमध्ये यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वाटप करण्यात आले. अश्विनी बानकर व मधुबाला बानकर यांनी आभार मानले. सूत्रसंचालन गणेश हापसे यांनी केले.एकास एक परफॉर्मन्स,रेकॉर्ड ब्रेक गर्दी,अतिशय सुंदर नियोजन हे यंदाच्या सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरले. उत्कृष्ट गॅदरिंगची आजही चर्चा कायम आहे.