सोनई : आदिशक्ती रेणुकामातेच्या पावन पुण्य भूमीत श्री क्षेत्र बेल्हेकरवाडी येथे सिद्धेश्वर श्री संत गुलाब बाबा यांचा फिरता 17 वा अखंड हरिनाम सप्ताह 5 फेब्रुवारी पासून मोठ्या उत्साहात सुरू झाला.
पहिल्या दिवशी हभप दयाघन महाराज पंढरपूरकर यांची किर्तन सेवा झाली. संत गुलाब बाबांचे कार्य त्यांनी आपल्या कीर्तनातून सांगितले. दुसऱ्या दिवशी शिवशाहीर कल्याण महाराज काळे यांचे तर तिसऱ्या दिवशी भागवताचार्य हभप रमेशनंदजी महाराज जाधव यांनी सृश्राव्य किर्तन केले.विनोदी शैलीत चालू घडामोडींवर भाष्य केले. प्रत्येकाच्या जीवनात देव व संतांची भेट होत असते.फक्त त्यासाठी परिचयाची गरज आहे. असे प्रतिपादन जाधव महाराज यांनी केले. कीर्तनातील उत्कृष्ट गायन अनेकांना भावलं.
पहिल्या दिवसापासून भाविकांची संख्या लक्षणीय आहे. सोनई परिसरासह नेवासा तालुका व राज्यभरातील संत गुलाब बाबा भक्त परिवार सहभागी होत आहे.5 ते 12 फेब्रुवारी दरम्यान होत असलेल्या यंदाच्या 17 व्या सप्ताहाचे मानकरी सरपंच संतोष जनार्दन शिंदे व ग्रामस्थ मित्र परिवाराकडून आदर्शवत असे उत्कृष्ट नियोजन होत आहे. भव्य मंडप,आकर्षक डेकोरेशन, लक्षवेधी ठरणारी पांडुरंग व संत गुलाब बाबांची प्रतिमा, विद्युत रोषणाई,भोजन व पार्किंग व्यवस्था यासाठी जेष्ठ व्यक्तींसह तरुण सेवेत आहेत. आदर्शवत अशा हरिनाम सोहळ्याचं परिसरातून कौतुक होत आहे.
चौथ्या दिवसाची कीर्तन सेवा जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थानचे हभप अंकुश महाराज जगताप यांची होत आहे.पाचव्या दिवशी हभप तुषार महाराज पाटील काटेलधाम यांची होईल.सहाव्या दिवशी हभप शाहीर लोनाग्रे महाराज काटेलधाम तर सातव्या दिवशी प्रसिद्ध कीर्तनकार रामायणाचार्य हभप रामराव महाराज ढोक यांचे किर्तन होणार आहे.तर,बुधवार 12 फेब्रुवारी रोजी हभप कबीर महाराज आत्तार सातारकर यांचे काल्याचे किर्तन होणार आहे.
दररोज कीर्तनानंतर महाप्रसादाचे आयोजन केले जाते.अनेक अन्नदात्यांचा सहभाग पाहायला मिळत आहे. नामांकित महाराज मंडळींची कीर्तन सेवेसाठी संत पुजनाचे यजमान यांचे विशेष सहकार्य लाभले. दिवसभरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. पारायण व सायंकाळी बाल वारकऱ्यांसह महिला व पुरुष भाविक हरिपाठकीर्तन दंग होवून हरी नामाचा आनंद घेत आहे. कीर्तनानंतर संत पुजनाचे यजमान अन्नदाते कीर्तनकार यांना साथ संगत करणारे गायक टाळकरी,वादक,देणगीदार यांचे प्रसिद्ध निवेदक पत्रकार गणेश हापसे व हभप गव्हाणे महाराज यांनी आभार मानले ...