अहिल्यानगर : जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात राज्यभरातील अन्य गावातील विद्यार्थी येऊन बारावीला प्रवेश घेतात. या विद्यार्थ्यांना पास करण्याची जबाबदारी काही दलाल घेत असून यात लाखो रुपये उकळले जात आहे. फक्त नावापुरता ‘बारावीला केवळ प्रवेश घ्यायचा अन् ऐन परीक्षेला यायचे. परीक्षेतही कॉपीच्या मदतीने उत्तरे लिहिण्याची सुविधा असेल’ असे आमिष दाखवले गेल्याने अहिल्यानगर जिल्ह्याबाहेरून अनेक तरुण-तरुणी पाथर्डी तालुक्यात प्रवेश घेत आहेत. मुलांचा प्रवेश ते त्यास उत्तीर्ण करणे या कामासाठी २५ हजार रुपयांहून अधिक शुल्क आकारले जात असल्याचे समजते. ही मुले राहतात कोठे? वर्गात येतात का? याची काहीही चौकशी शिक्षण विभाग करत नाही. परीक्षेच्या दिवशी काही एजंट ‘सुपारी’ घेऊन या मुलांना कॉपी पुरवितात.
या वर्षी परीक्षा मंडळाने ‘कॉपीमुक्त परीक्षा’ अभियान सुरू केल्याने परीक्षा केंद्रांबाहेर सीसीटीव्ही, ड्रोन कॅमेरे, बैठे पथक याद्वारे बंदोबस्त ठेवण्यात येत आहे. पुणे, मुंबई, मराठवाड्यातून आलेल्या अनेक परीक्षार्थी यांची आता धांदल उडाली आहे.केंद्रांनी यावर पर्याय म्हणून आतल्या आत कॉपी पुरविण्याचे प्रकार सुरू केल्याची माहिती आहे. वर्षभर कॉलेजला न येता मुले परीक्षेला कशी बसतात ? याबाबत स्थानिक अधिकारी नेमकी काय करतात? असा प्रश्न आहे. दरम्यान प्रशासनाची कितीही करडी नजर असली तरी कॉपी प्रकार होण्याची शक्यता व्यक्त झाली आहे. हे सीसीटिव्हीतून ही समोर येऊ शकते.
पाथर्डी शहर व तालुक्यातील लॉज सध्या हाऊसफुल आहेत. ही मुले केवळ परीक्षा देण्यासाठी येत असल्याने त्यांची राहण्याची अन्यत्र सोय नाही. त्यामुळे ते लॉजवर राहतात.
पाथर्डी तालुक्यात काही शिक्षण संस्थाचालक व एजंट कॉपीला प्रोत्साहन देत असल्याने तालुक्याची शैक्षणिक प्रतिमा मलिन होत आहे. त्यामुळेनागरिकांकडून’पाथर्डीकरांनो जागे व्हा’ असे फलक लावले जात आहेत.