गणेश हापसे गणराज्य न्यूज राहुरी : नाशिक परिक्षेत्राचे पोलिस महासंचालक दत्तात्रय कराळे यांनी राहुरी पोलिस ठाण्यास भेट देवून वार्षिक तपासणी केली. त्यांनी राहुरी पोलिस ठाण्याच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करुन येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुढील कामकाजाबाबत सूचना केल्या.
रविवारी (दि. २३) रोजी कराळे यांनी राहुरी पोलिस ठाण्याला भेट दिली. त्यावेळी जिल्हा पोलिस प्रमुख राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे, नाशिक येथील उपविभागीय पोलिस अधिकारी आगलावे, श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे आदी उपस्थित होते. राहुरी पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक संजय ठेंगे व कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी कराळे यांनी नेवासा, पाथर्डी, शेवगाव, श्रीरामपूर शहर, श्रीरामपूर तालूका, शनी शिंगणापूर, सोनई आदी पोलिस ठाण्यांतील पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा करुन त्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला. त्यानंतर राहुरी पोलिस ठाण्याची वार्षिक तपासणी करण्यात आली. गुन्हे निर्गती, मुद्देमाल निर्गती, प्रलंबित गुन्हे निर्गती, गुन्हे डिटेक्शन, तसेच राहुरी पोलिस ठाण्यातील स्वच्छता, सुशोभीकरण आदींबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. भविष्यातही अशीच उल्लेखनीय कामगिरी करुन महाराष्ट्र पोलिस दलाचा वारसा पुढे न्याल, अशी अपेक्षा कराळे यांनी व्यक्त केली.