अहिल्यानगर – जिल्ह्यासाठी नवे जिल्हाधिकारी म्हणून पंकज आशिया यांची नियुक्ती झाली आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची 10 दिवसापूर्वी साखर आयुक्तपदी नियुक्ती झाली. त्यांच्या जागेवर
डॉ. पंकज आशिया नवे जिल्हाधिकारी म्हणून आले आहेत.
आशिया हे सध्या यवतमाळ येथे कलेक्टर म्हणून कार्यरत होते.पंकज आशिया हे मूळचे राजस्थानमधील जोधपूरचे आहेत.2016 च्या बॅचचे ते आयएस अधिकारी आहेत.
राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरूच असून आताही आठ वरिष्ठ आयएएस
अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
त्यामध्ये MMRDAचे सहआयुक्त राधाविनोद शर्मा यांची मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर उद्योग संचालनालयाचे अतिरिक्त विकास अधिकारी एम जे प्रदीप चंद्रेन यांची बदली पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी करण्यात आली आहे. वैदेही रानडे यांच्याकडे रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
राज्यात फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून वरिष्ठ प्रशासनाचा खांदेपालट जोरदार गतीने सुरू आहे. आधी राज्यातील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यानंतर आता आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून आताही आठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
कोणत्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या? वाचा
1. राधाविनोद शर्मा (IAS:RR:2012) महानगर सहआयुक्त, MMRDA, मुंबई यांची मीरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
2. एम.जे. प्रदीप चंद्रेन (IAS:RR:2012) अतिरिक्त विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय, मुंबई यांची पुणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
3. बाबासाहेब बेलदार (IAS:SCS:2015) अतिरिक्त विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर विभाग यांची अल्पसंख्याक विकास आयुक्त, छत्रपती संभाजीनगर या पदावर नियुक्त करण्यात आले आहे.
4. जगदीश मिनियार (IAS:SCS:2015) मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी, छत्रपती संभाजी नगर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जालना या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
5. गोपीचंद कदम (IAS:SCS:2015) मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी, सोलापूर यांची अतिरिक्त आदिवासी आयुक्त, ठाणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
6. वैदेही रानडे (IAS:SCS:2015) सह व्यवस्थापकीय संचालक, MSRDC, मुंबई यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
7. डॉ. अर्जुन चिखले (IAS:SCS:2015) सदस्य सचिव, विदर्भ वैधानिक विकास मंडळ, नागपूर यांची फी नियामक प्राधिकरण, मुंबई, सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
8. डॉ. पंकज आशिया (IAS:RR:2016) जिल्हाधिकारी, यवतमाळ यांची अहिल्यानगर येथील जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
यापूर्वी 25 फेब्रुवारी रोजी सात वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले होते.आता पुन्हा 8 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले.