राहुरी : यंदाची दुष्काळजन्य परिस्थिती लक्षात घेता आपला वाढदिवस साधेपणाने साजरा करताना बुके,गुलाबपुष्प, पुष्पहार घेवून येण्याऐवजी गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य, गरजूवंतांना कपडे भेट देवून विधायक उपक्रम राबवूया असे आवाहन माजी मंत्री तथा आमदार प्राजक्त तनपुरे यांनी हितचिंतक व कार्यकर्त्यांना केले होते.
आमदार तनपुरे यांनी केलेल्या आवाहनास मोठा प्रतिसाद मिळाला असल्याचे पाहण्यास मिळाले.अनेकांनी शालेय साहित्य भेट दिले. गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी सायकल भेट दिली. लवकरच या साहित्याचे वाटप गरजवंत विद्यार्थ्यांना करण्यात येणार आहे.
चालू वर्षी राज्यात पाऊस कमी झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे यावर्षी मी माझा वाढदिवस अगदी साधेपणाने साजरा करत असून जिल्ह्यातील परिस्थिती दिवेंसदिवस अतिशय कठीण होत चालली आहे. उद्यापासून मी राहुरी, नगर, पाथर्डी मतदार संघात समक्ष फिरून पाहणी करणार असल्याचे प्रतिपादन आमदार प्राजक्त तनपुरे यांनी आयोजित करण्यात आलेल्या त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या प्रसंगी केले.
बुधवार १३ सप्टेंबर २०२३ रोजी आमदार प्राजक्त तनपूरे यांच्या वाढदिवसा निमित्त अभिष्टचिंतन सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी आमदार प्राजक्त तनपूरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी राहुरी, नगर, पाथर्डी येथील विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार तनपुरे पूढे म्हणाले कि, प्रथमच आमदार झालो. राज्याच्या मंत्रीपदाची जबाबदारी मिळाली. ती पार पाडतांना अनेकांचे सहकार्य लाभले. वांबोरी चारीतून मागील चार वर्षे पाथर्डी तालुक्यातील शेवटच्या तलावा पर्यंत पाणी पोचविले. वांबोरी चारीच्या टप्पा-२ च्या कामाला मंजुरी घेतली. तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून निळवंडे धरणाच्या कालव्यांच्या कामांना अडीच वर्षात एक हजार कोटींचा निधी उपलब्ध करून घेतला. मतदार संघात २५० नवीन रोहित्र, नऊ ठिकाणी वीज उपकेंद्र उभारणी व जुन्या उपकेंद्राच्या क्षमतेत वाढ केली. शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी. यासाठी मुख्यमंत्री सौर ऊर्जा वाहिनीच्या प्रकल्पांना मंजुऱ्या मिळविल्या. त्यातील बाभुळगाव येथील सौर ऊर्जा प्रकल्प सुरू झाला. वांबोरीच्या ऊर्जा प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. मागील सव्वा वर्षात सरकारच्या दुर्लक्षामुळे आरडगाव सौर ऊर्जा वाहिनीचे काम खंडीत झाले आहे. ऊर्जा विषयक सुविधा बळकट करण्यावर भर दिल्याने वीज वितरणात सुसूत्रता आली.
महाविकास आघाडीच्या काळात सुचविलेल्या व मंजूर करून घेतलेल्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या ग्रामीण भागातील महत्त्वाच्या विविध रस्त्यांची कामे सरकार बदलल्याने रखडली. त्यांची निविदा प्रक्रिया चार महिन्यापूर्वी होऊन अद्याप कार्यारंभ आदेश नसल्याने कामे सुरू नाहीत. त्यासाठी रस्ता रोको आंदोलन करावे लागले. असे आमदार तनपुरे यांनी सांगितले.
दरम्यान दुष्काळी परिस्थितीमुळे साध्या पद्धतीने अभिष्टचिंतन करावे. कार्यकर्त्यांनी पुष्पहार व पुष्पगुच्छ आणू नयेत. त्याऐवजी गरीब विद्यार्थ्यांसाठी वह्या व शालेय साहित्य द्यावे. असे आवाहन आमदार तनपुरे यांनी केल्याने मोठ्या प्रमाणात शालेय साहित्य जमा झाले. यावेळी कृपा वृद्धाश्रमातील वृद्ध महिला व पुरुषांना वस्त्रदान करण्यात आले. या प्रसंगी मतदार संघातील हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. आपला माणूस हक्काचा माणूस असे समजून नगरपरिषद मधील सफाई कामगार, वृद्ध व अनाथ महिलांनी यावेळी उपस्थित राहुन आमदार प्राजक्त तनपूरे यांना मनभरून शुभेच्छा दिल्या.