माझ्या मतदार संघातील प्रत्येक गावात जलगंगा- आमदार प्राजक्त तनपुरे
गणराज्य न्यूज – राहुरी :
गुजरातच्या भल्यासाठी काम करणार्या शिंदे-फडणवीस शासनान राज्याला अधोगतीकडे नेले आहे. ग्रामिण भागातील निधीला स्थगिती दिल्यानंतर अतिवृष्टी बाधितांनाही वार्यावर सोडले. गौण खनिजांच्या बंधनाने विकासाला वेसण घालणार्या भाजप शासनाने जनतेला अजून वेठीस धरणे योग्य नाही. राहुरी मतदार संघामध्ये पाणी योजनांच्या माध्यमातून जलगंगा वाहणार असल्याचे समाधान असल्याचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.
राहुरी तालुक्यातील मल्हारवाडी येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणी योजनेचा शुभारंभ व नविन वीज रोहित्राचे लोकार्पण असे एकूण १ कोटी रूपयांच्या विकास कामे गावासाठी दिल्यानंतर आमदार तनपुरे यांनी संवाद साधला. अध्यक्षस्थानी नारायण जाधव हे होते. आमदार तनपुरे यांनी सांगितले की, जलजीवन मिशन ही राज्य व केंद्र शासनाच्या निधितून कार्यरत असणारी योजना आहे. महाविकास आघाडी शासन कार्यरत असताना जलजीवन योजनेबाबत राज्यपातळीवर घेतलेल्या बैठकांचा सर्वाधिक लाभ राहुरी मतदार संघाला मिळाला. मिरी-तिसगाव, वरवंडी, वांबोरी, ब्राम्हणी, मल्हारवाडी यासंह अनेक गावातील पाणी योजनांचा शुभारंभ झाला. मतदार संघातील कुरणवाडी, बुर्हाणनगर आदी पाणी योजनांना सौर उर्जा प्रकल्प अंतर्गत वीज पुरवठा व्हावा यासाठी प्रयत्नशिल आहे. जिल्हा नियोजन बैठकीमध्ये यासाठी दोन कोटी रूपये निधीची मागणी करू. राज्यातील भाजप प्रणित शासनाने विकास कामांच्या निधीला स्थगिती देत ग्रामिण भागातील शेतकरी व ग्रामस्थांवर मोठा अन्याय केला.
अतिवृष्टीने प्रत्येक गावातील रस्त्यांची चाळण झाली. निधी गरजेचा होता. परंतु गुजरात धार्जिने राज्यातील शासनाने सर्वसामान्यांना रस्त्यासाठी निधी न देता तो बुलेट ट्रेनसाठी दिला. अतिवृष्टीने शेतकरी उद्धवस्त होऊन एक छदामही मिळाला नाही. विकास कामांच्या स्थगिती विरोधात उच्च न्यायालयात लढा सुरू आहे. पुढील वर्षाच्या मार्च अखेर पर्यंत न्याय देवतेचा न्याय अपेक्षित आहे.
सभेचे अध्यक्ष जाधव व सेवा संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र सरोदे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी सरपंच मंगेश गाडे, उपसरपंच रूपाली जाधव, तंटामुक्ती अध्यक्ष बाबासाहेब जाधव, रमेश गावडे, किशोर जाधव, जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे, जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रभाकर गाडे, वसंतराव गाडे, तनपुरे कारखाना संचालक भारत तारडे, आप्पासाहेब गावडे, ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र गावडे, मंदाकिनी गावडे, सेवा संस्था सदस्य सुधिर गावडे, प्रा. इजाज सय्यद, जिल्लूभाई पिरजादे, काशिनाथ डोंगरे, मधुकर गागरे, आप्पासाहेब कोठूळे यांसह पाणी पुरवठा अधिकारी, वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.