
-
- राहुरी : पूर्व भागातील ११ ग्रामपंचायत निकालांकडे लक्ष,
भावी सरपंच ,सदस्य,नेते मंडळींसह मतदार ग्रामस्थांची उत्सुकता पोहचली शिगेला
राहुरी : तालुक्याच्या पूर्व भागातील आरडगाव , मानोरी , मांजरी व केंदळ खुर्द सह तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल आज मंगळवारी आहे. तहसील कार्यालयात मतमोजणीला सुरुवात झाली आहे . दरम्यान , या मतमोजणीकडे उमेदवारांसह ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे .
राहुरी तालुक्यात विशेषतः मानोरी व आरडगाव येथील सरपंच पद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्याने नेतेमंडळीने हे पद मिळून गाव आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी प्रतिष्ठापणाला लावून आहेत . प्रचारादरम्यान सरपंच पदाची निवडणूक अनेक विषयांनी गाजल्याने सरपंच पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार , याची उत्सुकता उमेदवारास ग्रामस्थांना लागली आहे . या निवडणुकीकडे संपूर्ण राहुरी तालुक्याचे लक्ष लागले आहे . मानोरीत मावळते सरपंच हाजी अब्बास शेख यांनी जनसेवेच्या माध्यमातून पत्नी नजमा अब्बास शेख यांना सरपंच पदाच्या निवडणुकीत उतरवले तर,त्यांच्या विरोधात रेणुका माता ग्राम विकास मंडळाने ज्येष्ठ नेते बाळू काका बाघ यांच्या पत्नी व मागील सरपंच पदाचे उमेदवार चुवा बापूसाहेब वाघ यांच्या मातोश्री ताराबाई वाघ यांना उतरवले.त्यात बहुजन वंचित आघाडीचे बाबुराव मकासरे व बाबासाहेब आढाव यांनी विजया मकासरे यांना उमेदवारी देऊन निवडणुकीत रंगत भरली. त्यामुळे या पदासाठी मोठी चुरस निर्माण झालेली पहावयास मिळाली . . आरडगाव येथील सरपंच पदही सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे . येथे ग्रामपंचायतचे मावळते सदस्य व जनसेवा मंडळाचे निष्ठावान कार्यकर्ते सुनील मोरे यांनी पत्नी स्मिता मोरे यांना सरपंच पदाच्या निवडणुकीत उत्तरवले विरोधी ग्रामविकास मंडळाचे नेते माजी सरपंच व डॉ . तनपुरे साखर कारखान्याचे संचालक रवींद्र म्हसे यांनी पत्नी माजी सरपंच सुरेखा म्हसे यांच्या रूपाने भक्कम उमेदवार दिला. तर वंचित बहुजन आघाडीचे नेते अनिल जाधव यांनी पत्नी धनश्री जाधव यांना रिंगणात उतरून प्रस्थापितांच्या विरोधात निवडणुकीत रंगत आणली . त्यामुळे या दोन्ही ठिकाणी प्रचारात आरोप प्रत्यारोपा बरोबरच छुप्या पद्धतीने जातीच्या कार्डचा वापर झाला असल्याची चर्चा होती . या दोन्ही ठिकाणच्या प्रामुख्याने सरपंच पदाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे . सदस्य बॉडी ही आपलीच निवडून येण्यासाठीही मोठे प्रयत्न झाल्याने पैजा कोण जिंकणार , कोण हरणार ? सरपंच पदाच्या निवडीवर पडलेली पैजा कोण जिंकणार कोण हरणार यावरही मोठी चर्चा रंगत आहे .