गणराज्य न्यूज
वांबोरी: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाची महादेव वस्ती येथे शाळांतर्गत वार्षिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता पहिली किलबिल गट, दुसरी बालगट, तिसरी लहानगट तर चौथीचा मोठा गट अश्या चार गटात ही स्पर्धा घेण्यात आली.
यामध्ये १००मीटर धावणे, लांब उडी, उंच उडी, थ्रो बॉल, चमचा लिंबू, रिले रेस अशा वैयक्तिक तर मुले विरुद्ध मुली कब्बडी, खो खो या सांघिक स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने सहभाग नोंदवत खेळात यश मिळवण्यासाठी अटीतटीने मोठ्या चढाओढीने विजयासाठी प्रयत्न केले. सर्व वैयक्तिक व सांघिक स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले.
फिट इंडिया उपक्रमांतर्गत शाळेला स्पर्धा घ्यायच्या असतांना शाळेला मैदानासाठी जागा उपलब्ध नसतानाही खेळाचे महत्व लक्षात घेऊन पालक श्री चंद्रकांत श्रावण गवते यांनी स्पर्धा घेण्यासाठी तसेच सरावासाठी स्वतःची शेतातील जागा साफ करून उपलब्ध करून दिले तसेच पालकांनी विद्यार्थ्यांना अल्पोपहार, फळांची ही व्यवस्था करून दिल्याबद्दल शाळेच्या शिक्षिका ज्योत्स्ना साळुंके व श्री अजय ससे यांनी त्यांचे विशेष आभार मानले. यावेळी वांबोरी केंद्रातील शिक्षक, पालक, शिक्षणप्रेमी नागरिक, तरुण मित्रमंडळ, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याचे विशेष कौतुक केले.